लोणावळा नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांचा एल्गार! ‘एकतर स्वतःची बदली करून घ्या, अन्यथा कार्यपद्धती सुधारा’; मुख्याधिकाऱ्यांना दिला निर्वाणीचा इशारा

‘मर्जीतील अधिकारी’ आणण्याच्या चर्चांना चोख प्रत्युत्तर. “आम्हाला कोणाचेही ‘जी हुजूर’ करणारे अधिकारी नको, जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला कार्यक्षम अधिकारी हवा आहे,” लोकप्रतिनिधींची ठाम भूमिका.

लोणावळा : “साहेब मिळेना… कामं होईना!” या उद्विग्न भावनेतून लोणावळा नगरपरिषदेत सुरू झालेला सत्ताधारी नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता टोकाचा झाला आहे. शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकल्या नंतर सोमवारी पुन्हा एकदा सर्व नगरसेवक आक्रमक पवित्र्यात दिसून आले. “एकतर स्वतःची बदली करून घ्या, अन्यथा कार्यपद्धती सुधारा,” असा थेट आणि निर्वाणीचा इशारा सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात धुसफूस सुरू होती, जिचा स्फोट २० मार्च रोजी झाला. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आल्यानंतर शहराला ‘गतिमान विकासाची’ अपेक्षा होती. मात्र, नगराध्यक्षांसह सर्व सभापती पालिकेत हजर असताना, मुख्याधिकारी मात्र कार्यालयीन वेळेत गायब असल्याचा तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या या अकार्यक्षमतेचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक करीत आहे. शिवाय मुख्याधिकारी सायंकाळ नंतर कार्यालयात येऊन रात्र उशिरापर्यंत थांबून ज्या पद्धतीने काम करतात त्यावरही अनेक प्रश्नचिन्ह आणि शंका उपस्थित करण्यात आल्या आहे.

शुक्रवारच्या घटनेनंतर हा वाद शांत होईल असे वाटत असतानाच, सोमवारी सकाळी सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तातडीची बैठक घेतली. बैठकीनंतर आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दालनाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या समोर दोन प्रमुख पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःची बदली करून घ्यावी. अन्यथा आमदार सुनील शेळके यांच्या मध्यस्थीनंतर सुधारणेसाठी एक महिन्याची मुदत घ्यावी. मात्र ​या कालावधीतही त्यांच्या कार्यपद्धती मध्ये, कामकाजात सुधारणा न झाल्यास पुन्हा त्यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

खरंतर मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या धुसफूसीचा एकूण परिपाक या टाळेबंदी ​मधून दिसून येत आहे. ​काही राजकीय वर्तुळात ही कृती ‘मर्जीतील अधिकारी’ आणण्यासाठी असल्याचे बोलले जात असले तरी, सत्ताधाऱ्यांनी या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हाला कोणाचेही ‘जी हुजूर’ करणारे अधिकारी नको आहेत, तर लोणावळ्याच्या विकासाच्या फाईल्स वेगाने निकाली काढणारा आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला कार्यक्षम अधिकारी हवा आहे,” अशी ठाम भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.

खरंतर या घटनेनंतर शहरात अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यातही ​मागील चार वर्षे लोणावळ्यात प्रशासकीय राजवट होती, जिथे अधिकाऱ्यांची हुकूमत चालत होती. मात्र, आता थेट जनतेमधून निवडून आलेले नगराध्यक्ष आणि कार्यक्षम नगरसेवक असतानाही प्रशासन जुन्याच ढिम्म पद्धतीने चालणार असेल, तर त्याला लगाम घालणे ही काळाची गरज होती. कालची टाळेबंदी ही त्याच साचलेल्या संतापाचा आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नसल्याची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *