लोणावळ्यात श्री नारायणी सेवा संस्थान आयोजित’मोफत महा मेडिकल शिबिर’ उत्साहात संपन्न; ३०० रुग्णांनी घेतला लाभ

लोणावळा: लोणावळ्यातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री नारायणी सेवा संस्थान आणि श्री नारायणी नारी चेतना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘मोफत महा मेडिकल शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी तुंगार्ली येथील श्री मधुसुदन झुनझुनवाला हेल्थ केअर सेंटरमध्ये हे शिबिर संपन्न झाले.

​या भव्य शिबिरात परिसरातील सुमारे ३०० रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ तपासणीवर न थांबता, रुग्णांना आवश्यक ती औषधे देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच शिबिरास भेट देणाऱ्या रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्थाही संस्थानातर्फे करण्यात आली होती.

​या ​शिबिरामध्ये विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली, ज्यात प्रामुख्याने ​हृदयरोग, स्त्रीरोग आणि त्वचारोग तपासणी. ​दंतरोग, नाक-कान-घसा आणि नेत्ररोग तपासणी.​मधुमेह (डायबिटीज), थायरॉईड आणि कॅन्सर तपासणी.​ अस्थिरोग (हाडांचे विकार), बालरोग आणि जनरल तपासणी यांचा समावेश होता.

​हे शिबिर श्री काशिप्रसादजी मोरारका यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. याप्रसंगी श्री नारायणी सेवा संस्थानचे विश्वस्त आवर्जून उपस्थित होते. संस्थानाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *