लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पाळेकर, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार वाळंज यांची निवड

लोणावळा: लोणावळ्यातील नामांकित पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण सेवा प्रदान करणाऱ्या ‘लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट’ या संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पांडुरंग पाळेकर तर उपाध्यक्षपदी नंदकुमार सोनू वाळंज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी या दोन अनुभवी नेतृत्वांकडे धुरा सोपवण्यात आली आहे.

​नूतन अध्यक्ष दत्तात्रय पाळेकर हे मागील ३५ वर्षांपासून या संस्थेशी एकनिष्ठपणे जोडले गेले आहेत. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी विश्वस्त, संचालक, खजिनदार, सचिव आणि उपाध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे. पुणे जिल्हा संस्थाचालक संघटनेचे संस्थापक सदस्य म्हणूनही ते कार्यरत असून, त्यांचा शिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या सर्वोच्च पदी निवड करण्यात आली आहे.

​संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले नंदकुमार वाळंज हे लोणावळा शहर व परिसरातील एक ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व आणि यशस्वी उद्योजक आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य आणि समाजातील सर्व घटकांसाठी असलेले त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या विस्तार आणि विकासासाठी होणार आहे.

​या निवडीनंतर बोलताना दत्तात्रय पाळेकर यांनी सांगितले की, विश्वस्त मंडळाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडून लोणावळा शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर, मावळ व मुळशी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संसाधने आणि नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख आव्हान आमच्यासमोर असल्याचे नंदकुमार वाळंज यांनी नमूद केले.

​या निवडीबद्दल सर्व स्तरांतून पाळेकर आणि वाळंज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *