भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे शिवक्रांती कामगार संघटनेकडून जंगी स्वागत

लोणावळा : भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नवनिर्वाचित नियुक्ती झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांचे लोणावळा शहरात आगमन झाले असता, शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात महाडिक यांनी उपस्थित कामगार आणि युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव मांडले.

यशस्वी होण्यासाठी ‘संयम’ हाच मंत्र – कृष्णराज महाडिक

उपस्थितांना संबोधित करताना कृष्णराज महाडिक म्हणाले की, “कोणत्याही क्षेत्रात, मग ते राजकारण असो वा समाजकारण, यशस्वी होण्यासाठी संयम बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे.” आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, महाडिक परिवाराला मोठा राजकीय वारसा असला तरी, त्यांची पिढी व्यवसायात व्यस्त होती. मात्र, २०२२ मधील राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपची कार्यपद्धती आणि शिस्त त्यांनी जवळून अनुभवली आणि तिथूनच त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली.

“पक्ष संघटनेने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून मी काम केले. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. या निष्ठेचे फळ म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीची मला पूर्वकल्पना नव्हती, परंतु आता या पदाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना ताकद देण्यासाठी आणि संघटना वाढीसाठी मी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन महाडिक यांनी केले.

या स्वागत सोहळ्याला लोणावळा आणि मावळ भागातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शिवक्रांती कामगार संघटना: सरचिटणीस ॲड. विजयराव पाळेकर, खजिनदार रवींद्र साठे, संघटक प्रतीक पाळेकर, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, विद्यमान उपनगराध्यक्ष देविदास कडू, माजी नगरसेविका बिंद्रा गणात्रा, माजी नगरसेवक गिरीश कांबळे, लोणावळा शहर अध्यक्ष अनिल गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा परीजा भिलारे, मंगेश कदम, हर्षल होगले, गणेश साठे याशिवाय प्रथमेश पाळेकर, अथर्व पाळेकर, शुभम मानकामे, श्रवण चिकणे यांच्यासह शिवक्रांती कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.

लोणावळ्यातील या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना महाडिक यांनी स्पष्ट केले की, आगामी काळात लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातील. तरुणांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना संघटनेच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *