महिला आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या लोणावळा पोलिसांच्या जाळ्यात; अनेक गुन्हे उघड

लोणावळा: महिला आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील पोलिसांना हवा असलेला आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार उर्फ सालट याला पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्नाटक राज्यातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता.

सप्टेंबर २०२३ मध्ये, लोणावळा उपविभागाचे तत्कालीन एस.डी.पी.ओ. सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लोणावळ्यातील क्रांतीनगर परिसरात आरोपी अल्पवयीन मुली आणि महिलांना पळवून आणून त्यांना मारहाण करत डांबून ठेवतात. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राज सिद्धेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे या दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली होती. मात्र, त्यावेळी या टोळीचा मुख्य सूत्रधार बेताब पवार पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

पवारच्या घरातून पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने या महिलेचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केले होते. तिला घरात कोंडून ठेवून तिचा मोबाईल आणि रोकड हिसकावून घेण्यात आली. इतकेच नाही, तर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचारही करण्यात आले. सुटकेच्या वेळी पोलिसांना घरात आणखी एक अल्पवयीन मुलगी आणि एक अल्पवयीन मुलगा सापडला. त्यांनाही घरात साखळीने बांधून ठेवण्यात आले होते. त्यांना उपाशी ठेवून घरातील कामे करायला लावली जात होती आणि त्यांच्यावर अमानुष मारहाण केली जात होती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही उघडकीस आले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेताब पवार हा अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरात आणि कर्नाटक राज्यातही अपहरण आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो साबरमती कारागृहातून तात्पुरत्या जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा हजर झाला नव्हता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला हा आरोपी कर्नाटकातील कलबुर्गी येथे असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कलबुर्गी गाठले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी बेताब पवारला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या बेताब पवारला लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पो स्टे चे पो. नि. राजेश रामाघरे, लोणावळा ग्रामीण पो स्टे चे पो.नि. दिनेश तायडे तसेच पोसई प्रकाश वाघमारे, अंमलदार तुषार भोईटे, सागर नामदास, रईस मुलाणी, राहुल चोरगे, संतोष साठे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *