बधलवाडी, दि. ४ (प्रतिनिधी) : बधलवाडी येथील ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनाने मेघाताई भागवत यांच्या गावभेटीचा शुभारंभ झाला. या भेटीदरम्यान त्यांनी गावातील वडीलधारी मंडळी, महिला भगिनी आणि युवकांशी संवाद साधत विविध स्थानिक विषयांवर चर्चा केली. नागरिकांनी त्यांचे स्वागत करून गावातील प्रश्न व अपेक्षा मांडल्या.
नागरिकांशी साधलेल्या या संवादादरम्यान मेघाताई भागवत यांनी “गावोगावी भेटी घेऊन लोकांच्या गरजा जाणून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे,” असे सांगितले.

मेघाताई भागवत या सामाजिक कार्यात सक्रिय असून गेल्या काही वर्षांत त्यांनी परिसरातील महिलांच्या स्वावलंबन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे स्थानिक स्तरावर त्यांच्याबद्दल आत्मीयतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी प्रशांत दादा भागवत देखील उपस्थित होते. दोघांनीही ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधत गावाच्या सर्वांगीण विकासाबाबत विचार विनिमय केला. गावातील अनेक नागरिकांनी “भागवत दाम्पत्य गावातील प्रत्येक आनंद-दुःखात सहभागी होते,” असे मत व्यक्त केले.

अलीकडच्या काळात मेघाताई भागवत यांच्या विविध गावभेटी, संवाद सत्रे आणि सामाजिक उपक्रमांना परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे साधेपण, समाजकारणातील सातत्य आणि जनसंपर्क यामुळे बधलवाडीसह परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.



