लोणावळा: येथील श्री स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून, सन २०२६-२०२८ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी श्री. गिरीशजी पारख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘नवरत्न चिक्की व फरसाण’चे उत्पादक म्हणून परिचित असलेले पारख, अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांवर सक्रियपणे कार्यरत आहेत. गिरीश पारख यांचा समाजकार्यातील दांडगा अनुभव आणि मोठा जनसंपर्क विचारात घेऊन ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी संघाच्या विविध पदांवर मोलाचे योगदान दिले आहे. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजप जैन प्रकोष्ठचे सचिव, श्री ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे सहसचिव आणि श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स (महाराष्ट्र राज्य पंचम झोन) अल्पसंख्याक योजनेचे प्रांतीय अध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळत आहेत.
या निवडीचे विशेष महत्त्व म्हणजे, पारख यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लोणावळा येथे महासाध्वी पू. श्री. सिद्धीसुधाजी म. सा. आदी ठाणा यांचा पावन चातुर्मास संपन्न होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जैन समाजासह लोणावळ्यातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली संघ अधिक जोमाने सामाजिक कामे करेल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे.

