तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात तळेगावकर नागरिक अखेर रस्त्यावर उतरले असून, त्यांनी मराठा क्रांती चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक गंभीर अपघात झाले असून, त्यात निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत.
वारंवार तक्रारी करूनही PWD विभागाने दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. या निष्क्रियतेमुळे त्रस्त झालेल्या जनतेने आता हक्क मिळवण्यासाठी हा लढा सुरू केला आहे. या आंदोलनाला परिसरातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून, इंदोरी येथील नागरिकांनाही या खड्ड्यांचा मोठा त्रास होत असल्याने प्रशांत दादा भागवत यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
दादा भागवत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “नागरिकांचा आवाज हा शासनाने ऐकलाच पाहिजे. विकासकामांच्या नावाखाली जर लोकांचे जीव धोक्यात येत असतील, तर अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
तळेगाव ते चाकण महामार्ग हा हजारो नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दैनंदिन मार्ग आहे. मात्र रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनधारकांचे कंबरडे मोडले असून, रुग्णवाहिकांना अडथळे येत आहेत, परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशांत दादा भागवत यांच्या पाठिंब्यामुळे या जनआंदोलनाला अधिक बळ मिळाले असून, शासन आणि प्रशासनावर त्वरित दखल घेण्यासाठी दबाव वाढला आहे. तळेगावकर नागरिक आता न्याय मिळाल्याशिवाय माघार न घेण्याच्या निर्धाराने उपोषणाला बसले आहेत.

