लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या राजकारणात मोठे धक्कातंत्र पाहायला मिळाले. मागील अनेक महिन्यांपासून नगराध्यक्षपदासाठी तयारी करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील (Open Category) अनेक इच्छुकांचे स्वप्न आज सोमवारी एका झटक्यात भंगले आहे. कारण, मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी (SC) आरक्षित झाले आहे.
या आरक्षणामुळे लोणावळ्याच्या राजकीय वर्तुळात ‘कही खुशी, कही गम’ असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे.
तयारी करणाऱ्यांना ‘नशिबाची हुलकावणी’
मागील काही महिन्यांपासून अनेक इच्छुकांनी नगराध्यक्षपदाची संधी साधण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, लोकसंख्येनुसार लोणावळ्याचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने, त्यांची सगळी तयारी वाया गेली आहे. अनेकांनी या अनपेक्षित आरक्षणामुळे आपली राजकीय स्वप्नं बाजूला ठेवावी लागली आहेत.
दुसरीकडे, अनुसूचित जाती प्रवर्गात असणाऱ्या अनेक नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आरक्षण जाहीर होताच या प्रवर्गातील काही उत्साही उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपण भावी नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे घोषित देखील केले आहे.
प्रभाग आरक्षणाकडे आता लक्ष
नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे, आता सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष प्रभाग आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. लोणावळा नगर परिषदेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद इमारतीत होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे उमेदवार आता आपण ज्या प्रभागाचे नेतृत्व करतो, ते प्रभाग आरक्षण काय येणार याकडे डोळे लावून बसले आहेत. प्रभाग आरक्षणे जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रणनीतीचा आणि प्रचाराचा खरा रंग भरणार आहे.
नगर परिषदेची निवडणूक पक्षीय चिन्हावर होणार की आघाडी-युतीच्या माध्यमातून लढवली जाणार, यावर नगराध्यक्षपदाची अंतिम संधी कोणाला मिळणार हे निश्चित होणार आहे.
लोणावळ्याचे राजकारण आता SC प्रवर्गातील उमेदवारांभोवती केंद्रित होणार असून, प्रभाग आरक्षण सोडतीनंतर नेमके कोणते चित्र समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
