श्री एकवीरा देवी नवरात्र उत्सव २०२५: लोणावळा परिसरात वाहतूक मार्गात बदल, जड वाहनांना ‘नो-एंट्री’

लोणावळा: श्री एकवीरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी यंदाही लोणावळा परिसरात वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जुना पुणे-मुंबई हायवेवरील जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवात ५ ते ६ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वाहतुकीतील प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:

  • २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत कार्ला फाटा ते श्री एकवीरा देवी पायथा मंदिरापर्यंत सर्व अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंद (नो-एंट्री) करण्यात आला आहे.
  • २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या पाच दिवसांसाठी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत जुना पुणे-मुंबई हायवेवरील कुसगाव बुद्रुक टोलनाका (लोणावळा) ते वडगाव फाटा (वडगाव मावळ) या दरम्यान अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

पर्यायी मार्ग:

  • मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी: पुणे-मुंबई हायवेवरील जड वाहनांना वडगाव येथील तळेगाव फाटा येथून एक्सप्रेसवेने मुंबईकडे वळवण्यात येईल.
  • पुण्याकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी: जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून येणारी जड वाहने कुसगाव बुद्रुक टोलनाक्यावरून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुण्याकडे जातील.

या बदललेल्या मार्गांची माहिती घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. या आदेशामुळे उत्सवकाळात वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *