संजय मावकर यांचा लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

लोणावळा: लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे संजय मावकर यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वैयक्तिक कारणांबरोबरच नव्या नेतृत्वाला संधी मिळावी या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, पदाचा राजीनामा दिला असला तरी ते संघटनेचे एक सक्रिय सदस्य म्हणून कायम राहणार आहेत, असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.

संजय मावकर यांनी लोणावळा, खंडाळा आणि ग्रामीण भागातील अनेक तरुणांना एकत्र आणून टॅक्सी असोसिएशनला एक मजबूत संघटना बनवली. ओला-उबर सारख्या भांडवलदारी कंपन्यांच्या विरोधात त्यांनी सातत्याने संघर्ष केला आणि सदस्यांना लढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने अनेक यशस्वी आंदोलने केली. त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर टॅक्सी संघटनेच्या सदस्यांनी त्यांना राजीनामा परत घेण्याचा आग्रह धरला असून त्यांची मनधरणी सुरू केली आहे. यावर आता संजय मावकर तसेच संघटना काय निर्णय घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून संघटनेशी जोडले गेलेले मावकर, आता अध्यक्षपद सोडून इतर सदस्यांना संघटनेची जबाबदारी घेण्याची संधी देत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे संघटनेत नवीन ऊर्जा आणि नेतृत्व निर्माण होण्याची शक्यता आहे. मावकर यांनी स्पष्ट केले की, ‘अध्यक्षपदावरून पायउतार होत असलो तरी, टॅक्सीचालकांच्या हितासाठी आणि भांडवलदारी कंपन्यांविरोधातला लढा सुरूच ठेवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असेन.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *