इंदोरी – गणपती उत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सण असला तरी, विसर्जनानंतर घाटांची होणारी दयनीय अवस्था अनेकदा विषण्ण करणारी असते. निर्माल्याचे ढीग, नदीकाठी पडलेल्या मूर्ती आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे धार्मिक कार्याला गालबोट लागते, ही बाब मनाला चटका लावणारी आहे. हीच वेदना लक्षात घेऊन, पर्यावरणप्रेमी प्रशांत दादा भागवत आणि मुकाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून या समस्येवर उपाय शोधला आहे.
गेली १५ वर्षे मुकाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले प्रशांत दादा भागवत आणि त्यांचे सहकारी नेहमीच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असतात. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या काळात त्यांची विशेष पथके घाटांवर तैनात असतात. या पथकांकडून भाविकांना विसर्जन करण्यापूर्वी निर्माल्य वेगळे जमा करण्याचे आवाहन केले जाते. जमा झालेल्या निर्माल्याचे नंतर शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले जाते.

या उपक्रमामुळे आज इंद्रायणी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात थांबले आहे. विसर्जन घाट स्वच्छ दिसतात, दुर्गंधी पसरत नाही आणि रोगराईलाही आळा बसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, श्रद्धेने केलेल्या पूजेला कोणताही गालबोट लागत नाही.
या उपक्रमाबद्दल बोलताना प्रशांत दादा भागवत म्हणाले, “बाप्पाची पूजा करून त्याच मूर्तीची दुर्दशा होताना आम्हाला कधीच पाहवत नव्हती. म्हणूनच गेली पंधरा वर्षे आम्ही हे समाजकार्य करत आहोत. ही इंद्रायणी आमची माई आहे आणि तिची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे.”
या अनोख्या सामाजिक पुढाकारामुळे मुकाई मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


