लोणावळा : लोणावळा शहरातील उद्यानांच्या विकासाला आता चालना मिळणार आहे. ‘नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लोणावळा नगरपरिषदेसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून. यासोबतच, मावळ तालुक्यातील इतर तीन महत्त्वाच्या शहरांसाठीही निधी मंजूर झाला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत आणि श्री क्षेत्र देहू नगरपंचायत यांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात उद्यान विकासाची कामे वेगाने सुरू होणार आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली असून, लवकरच कामांना सुरुवात होईल, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

लोणावळ्यात वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. शहरातील उद्यानांची दुरवस्था ही एक मोठी समस्या बनली आहे. आता ‘नमो उद्यान’ योजनेतून मिळालेल्या निधीमुळे लोणावळ्यातील उद्यानांचा कायापालट होणार आहे. आधुनिक सुविधांसह सुसज्ज अशी उद्याने तयार होऊन नागरिकांसाठी एक आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
या निधीबद्दल बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील शहरी भागांच्या विकासासाठी हा निधी महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दर्जेदार सुविधा मिळतील. मावळच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”
आमदार शेळके यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले. हा निधी केवळ मनोरंजनाचे साधन नसून, लोणावळ्यातील सामाजिक आणि आरोग्य संवर्धनाचे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
