लोणावळा: वलवण येथील पुलाखाली सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी छापा टाकून १३ जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी आणि एक कार असा एकूण ५,८९,०३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून वलवण पुलाखाली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सहायक फौजदार शकील शेख, पोलीस नाईक हनुमंत शिंदे आणि डायल ११२ चे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश जाधव यांना कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन खाजगी वाहनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. खात्री झाल्यावर त्यांनी दुपारी ५:१० वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. त्यावेळी काही लोक एका चादरीवर पत्ते मांडून पैशांचा ‘तीन पत्ती’ जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना जागीच पकडले.
या कारवाईत पोलिसांनी गुरुदेवसिंग किशनसिंग, विठ्ठल दुर्गाअप्पा बंडगर, मोहन मंजुळे, दिलीप शिंदे, संदीप ठोंबरे, विशाल सुरेश पाळेकर, सुनील खांडेभरड, तुकाराम येवले, संतोष येवले, किसन मेने, सीताराम खांडेभरड, विनोद घारे आणि नीरजसिंग माताप्रसाद विमल या १३ जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांकडून रोख रक्कम, तसेच १३ मोबाईल फोन, विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि एक वॅगनर कार असा एकूण ५,८९,०३०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक २,१३,९७०/- रुपयांचा मुद्देमाल तुकाराम येवले याच्याकडे, तर १,१०,५००/- रुपयांचा मुद्देमाल सुनील खांडेभरड याच्याकडे आढळून आला.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शकील शेख पुढील तपास करत आहेत.
