लोणावळा: पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भर दुपारी दारूच्या नशेत असलेल्या काही महिलांनी धिंगाणा घालत एकमेकांना मारहाण केली. लोणावळा पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
ही घटना लोणावळ्यातील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ए-१ चिक्की दुकानाच्या समोर घडली. भर रस्त्यात सुरू असलेल्या या गोंधळामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या गोंधळामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.
पोलीस ठाण्यापर्यंत धिंगाणा सुरूच
घटनेची माहिती मिळताच लोणावळा वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दारूच्या नशेत असलेल्या या महिला आणि पुरुषांनी पोलिसांचे ऐकले नाही. त्यांचा धिंगाणा वाहतूक पोलीस चौकीपर्यंत सुरूच होता. त्यानंतर, महिला पोलिसांच्या मदतीने या सर्वांना लोणावळा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे संकेत दिले आहे
