लोणावळा: आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाबद्दल अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल,’ असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाच्या जोरावर व्यक्त केला.
‘विकासपुरुष’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या आमदार शेळके यांनी मावळ तालुक्यात केलेल्या विकासकामांमुळे हा आत्मविश्वास वाढला आहे. लोणावळ्यात साकारलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी प्रचारसभेत व्यक्त केला.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची प्रचार फेरी राजेंद्र बबनराव सोनवणे (नगराध्यक्ष पदाचे उमेदवार) यांच्या नेतृत्वाखाली पांगळोली, तुंगार्ली आणि इंदिरानगर परिसरात उत्साहात पार पडली. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक आणि परिसर विकास या मुद्द्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
प्रचार दौऱ्यात दिसून आलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हाच विजयाचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले. कार्यकर्त्यांची एकजूट पाहून आमदार शेळके यांनी आवाहन केले: “लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासाची वेळ आली आहे. माझ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय द्या.”





