लोणावळा: लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी माजी नगरसेवक आणि लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील वलवण येथे असलेल्या नामांकित लोणावळा महाविद्यालयाची जबाबदारी हा ट्रस्ट सांभाळते.

या महाविद्यालयात सध्या १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये ज्युनिअर कॉलेजपासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. गेल्या सात वर्षांपासून विशाल पाडाळे महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य म्हणून सक्रिय होते.
त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांची ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली. त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सचिव ॲड. निलिमा खिरे, खजिनदार दत्तात्रय येवले, सहसचिव ॲड. अजय भोईर, विश्वस्त नंदुभाऊ वाळंज, सुनील ठोंबरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना विशाल पाडाळे यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, लोणावळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नवीन शैक्षणिक कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
