लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (+2) विभागाच्या वतीने नुकतेच ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत एका महत्त्वपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गावरील सुरक्षितता आणि वाहतुकीच्या नियमांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला खंडाळा महामार्ग विभागाचे वाहतूक निरीक्षक भीमसेन शिखरे आणि त्यांचे सहकारी संतोष राठोड यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. श्री. शिखरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महामार्ग वाहतुकीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी अपघाताच्या वेळी मदतीचे महत्त्व, वाहन चालवताना वाहन परवान्याची (लायसन्सची) आवश्यकता, देशातील रस्ते अपघातातील मृत्यूचे चिंताजनक प्रमाण यावर प्रकाश टाकला. तसेच, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास स्वतःच्या आणि इतरांच्या मृत्यूला कसे कारणीभूत ठरू शकतो, याबाबतही त्यांनी सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी भूषवले. त्यांनी स्वीडनसारख्या देशाचे उदाहरण देत भारतातील अपघाताचे प्रमाण खूपच चिंताजनक असल्याचे नमूद केले आणि वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. पराग कुलकर्णी यांनी केले, तर एन.एस.एस. (+2) कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. धनराज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कनिष्ठ विभाग प्रमुख ऍनी वर्गीस, प्रा. संजय साळुंके, प्रा. शशिकला ठाकर, प्रा. वैशाली कचरे, प्रा. मोहिते, राणे, प्रा. रूपाली गवळी, प्रा. भावना तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

