लोणावळा: लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. एका गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शकील मोहम्मद शेख (वय ४५), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (तपासी अधिकारी), लोणावळा शहर पोलीस स्टेशन, यांनी एका ४२ वर्षीय तक्रारदाराकडे लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने याबद्दल थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB), पुणे येथे २३ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, २५ सप्टेंबर रोजी सापळा रचून आरोपी शकील मोहम्मद शेख याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीने केली आहे. सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या लोकसेवकांवर एसीबीने केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. लाचखोरी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
