श्री. मंगेशभाऊ दत्तात्रय मावकर यांच्या वतीने महिलांसाठी खास उपक्रम; पालिका निवडणुकीच्या तयारीची चर्चा
लोणावळा: येथील तुंगार्ली गावातील सामाजिक-राजकीय नेतृत्व व राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर युवकअध्यक्ष श्री. मंगेशभाऊ दत्तात्रय मावकर यांनी आयोजित केलेल्या ‘न्यू होम मिनिस्टर’ या खास महिला भगिनींसाठीच्या खेळ स्पर्धेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंगेश मावकर यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा एकप्रकारे नारळ फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मावकर हे प्रभाग क्रमांक ०२ (तुंगार्ली) याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत आहेत. हा भव्य कार्यक्रम त्याच तयारीचा एक भाग मानला जात आहे.

या कार्यक्रमाला मावळचे कार्यसम्राट आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती, ज्यामुळे मावकर यांच्या उमेदवारीला पक्षातील बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट लोणावळा शहरचे अध्यक्ष रवी पोटफोडे, मावळ भूषण नंदकुमार वाळंज, लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका गौरीताई मावकर यांच्यासह संजय घोणे, सनी पाळेकर, धनंजय काळोखे, गणेश थिटे, अनिल मालपोटे, सुभाष सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या महिलेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस ‘स्कूटर’ ठेवण्यात आले होते, याशिवाय पुढील 6 उपविजेत्यांसाठी अनुक्रमे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, ॲक्वागार्ड, शिलाई मशीन यांसारखी मोठी बक्षिसे देण्यात आली. तसेच ‘भव्य लकी ड्रॉ’द्वारे 15 विजेत्यांना खास बक्षिसे आणि प्रत्येक उपस्थित महिलेला आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि नागरिकांसाठी आयोजकांकडून जेवणाची सोय केली होती.

विजेत्या महिला आणि बक्षिसे:
- अश्विनी संतोष भालेराव – स्कुटर
- सुषमा प्रमोद कुटे – फ्रिज
- पल्लवी नीलेश भोंडवे – टी.व्ही.
- स्नेहल सागर लोखंडे – वॉशिंग मशीन
- पल्लवी विजय जाधव – पिठाची गिरण
- नीता शेलार – ॲक्वागार्ड
- सुनीता गणेश शेलार – शिलाई मशीन
श्री. मंगेशभाऊ मावकर यांनी या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणत एक प्रभावी शक्तीप्रदर्शन केले असून, तुंगार्ली प्रभागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मनोरंजनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

