– नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन संवादातून विश्वास जिंकण्याचा प्रयत्न
पवनानगर, दि. ४ (प्रतिनिधी): काले–कुसगाव जिल्हा परिषद गटात सध्या माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी सुरू केलेला ‘गावभेट संवाद दौरा’ या भागात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.
नुकत्याच झालेल्या दौऱ्यात ज्ञानेश्वर दळवी यांनी चावसर, केवरे, मोरवे, चाफेसर आणि कोळे या गावांना भेट दिली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत करत स्थानिक प्रश्न मांडले. दळवी यांनीही सर्वांच्या समस्या संयमाने ऐकून घेत, शक्य त्या पद्धतीने त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली.

चावसर आणि केवरे येथे संयुक्त ग्रामसभा घेऊन पुनर्वसन व मूलभूत सोयीसुविधांच्या अडचणी जाणून घेतल्या. मोरवे गावात नागरिक, महिला व युवकांशी संवाद साधला; तर चाफेसर येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देत शैक्षणिक वातावरणाचा आढावा घेतला. शेतातील महिला शेतकऱ्यांशी थेट शेतावर जाऊन संवाद साधला. त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यावर भेट देऊन आदिवासी बांधवांच्या प्रश्नांनाही त्यांनी गांभीर्याने ऐकले.

कोळे गावात, श्री वाघोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित ह.भ.प. कृष्णा महाराज पडवळ यांच्या कीर्तनाला उपस्थित राहून त्यांनी ग्रामस्थांसोबत हरिनाम गजरात सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

या सर्व भेटींत शहाजी गोणते, गोविंदराव गाऊडसे, उद्योजक गोविंद कोकरे, प्रमोद शिंदे, बबन वाघमारे, पांडुरंग जांभुळकर, ह.भ.प. भिकाजी तुपे यांसह अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.
मावळ पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून कार्यकाळात केलेल्या कामांमुळे ज्ञानेश्वर दळवी यांचा या भागात चांगला जनसंपर्क आहे. नागरिकांच्या आनंद–दुःखात सामील होणारे, सोबत चालणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याबद्दल स्थानिकांमध्ये आपुलकी आहे. काले–कुसगाव गटातील सध्याच्या चर्चेत त्यांच्या नावाची चर्चा वेगाने होत असून, ‘लोकांशी थेट संवादातून विश्वास जिंकणारे नेतृत्व’ अशी ओळख दळवी यांनी निर्माण केली आहे.

