बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! लोणावळ्याच्या मुख्य बाजारपेठेत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई, २ दिवसांत लाखो रुपयांचा दंड वसूल

लोणावळा : लोणावळ्यात (Lonavala) वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) कडक पाऊल उचलले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्यांवर जोरदार दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल २२० वाहनांवर कारवाई करून १ लाख ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लोणावळ्यातील बाजारपेठ भागात वाहतूक कोंडी (Traffic Jam) ही नित्याचीच बाब बनली आहे. अनेकदा नागरिक आपली वाहने रस्त्यावर कुठेही आणि कशीही पार्क करतात. यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि त्याचा मोठा फटका इतर वाहनचालकांना बसतो. यावर पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. दुहेरी (डबल) पार्किंग, पांढऱ्या पट्ट्यांच्या बाहेर पार्क केलेली वाहने, ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या असलेल्या गाड्या आणि ‘फक्त एक मिनिटात येतो’ असे सांगून रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या गाड्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे, नागरिकांनी आपली वाहने नियमांनुसार योग्य ठिकाणीच पार्क करावीत असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता तरी बेशिस्त वाहनचालकांना वचक बसेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *