लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वलवन आणि राष्ट्रीय सेवा योजना (+2) यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या ‘वन्यजीव सप्ताह’ निमित्त महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम वनविभाग पुणे वनपरिक्षेत्र, शिरोता यांच्या सहकार्याने वन्यजीव जनजागृती व संवर्धन या विषयावर घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वनविभाग पुणे कडून प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. डी. पी. चव्हाण (वनरक्षक), श्रीमती. मोहिनी एन. शिरसाट (वनरक्षक) आणि श्री. जिगर सोलंकी (वन्यजीव शास्त्रज्ञ) हे उपस्थित होते.

मार्गदर्शकांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांसमोर वन्यजीवनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी निसर्गातील जीवनचक्र, सृष्टीतील वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज आहे, यावर भर दिला. तसेच, नैसर्गिक समतोलासाठी वन्यजीवांचे महत्त्व विशद केले.
विशेषतः, त्यांनी सापांविषयीचे समज-गैरसमज दूर केले आणि सर्पदंश (साप चावल्यानंतर) झाल्यावर करावयाचे प्रथमोपचार याबद्दल शास्त्रीय माहिती दिली. उपस्थितांना वन्यजीवांचे महत्त्व स्वतः माहिती सांगून तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्राण्यांची चित्रफित दाखवून सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित राणे आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. धनराज पाटील यांनी केले. यावेळी वनविभागाचे अन्य कर्मचारी तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ऍनी वर्गीस, प्रा. संजय साळुंखे, प्रा. शशिकला ठाकर, प्रा. वैशाली कचरे, प्रा. तनवी भोंडवे मॅडम, प्रा. मोहिते, प्रा. धनश्री गाडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार प्रा. रूपाली गवळी यांनी मानले. वन्यजीव संवर्धनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठी जागरूकता निर्माण करणारा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

