मावळ: शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील राजकारण एका नव्या वळणावर आले आहे. प्रशांत भागवत युवा मंचतर्फे आयोजित कुंकुमार्चन सोहळा केवळ धार्मिकच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरला. या सोहळ्याला हजारो महिलांची उपस्थिती होती आणि त्याचवेळी आमदार सुनील शेळके यांनी प्रशांत भागवत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत दिले.
कार्यक्रमात देवीसमोर साकडं घालताना आमदार शेळके यांनी, “प्रशांत दादा भागवत यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात” अशी जाहीर प्रार्थना केली. त्यांच्या या विधानामुळे मावळच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असलेले प्रशांत भागवत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण नाव बनले आहे. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून, आता त्यांना आमदार शेळके यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा पाठिंबा मिळाल्याने त्यांची उमेदवारी आणखी भक्कम झाली आहे.
तालुक्यातील जनतेशी असलेला त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि तरुणांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता यामुळे त्यांना मावळात उदयास येणारे नेतृत्व मानले जाते.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आमदार शेळके यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे प्रशांत भागवत यांच्या राजकीय वाटचालीला नवीन बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मावळमध्ये एक मोठी आणि रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मावळच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

