लोणावळा : मावळ तालुक्यातील वेहेरगाव येथील भाजप नेत्या सायली जितेंद्र बोत्रे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे लोहगड येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश उर्फ तात्यासाहेब बबन धानिवले यांची पुणे जिल्हा (उत्तर) भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष प्रदीप कंद यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या घोषणेत ही निवड जाहीर केली.
महिला सबलीकरणासाठी सायली बोत्रे यांचे महत्त्वपूर्ण योगदान
सायली बोत्रे यांनी यापूर्वी महिला मोर्चा मावळ तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीतही संघटना मजबूत ठेवली. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, पक्षाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवणे आणि संघटन बांधणीमध्ये पुढाकार घेणे यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे पती जितेंद्र बोत्रे हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत.
गणेश धानिवले यांचा लोणावळा आणि मावळ भागात मोठा जनसंपर्क
गणेश धानिवले हे लोहगड विकास सोसायटीच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी ते सातत्याने काम करत आहेत. पवन मावळ, नाणे मावळ आणि लोणावळा या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या पत्नी अलका धानिवले जिल्हा परिषद सदस्या असताना गणेश धानिवले यांनी संपूर्ण पावन मावळ परिसरात जनसंपर्क वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
या दोन्ही निवडींमुळे मावळ तालुक्यातून भाजपची संघटना अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
