दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘ऑफबीट फाउंडेशन’चा मदतीचा हात; घेरेवाडी व लोहगड शाळेला लॅपटॉप आणि प्रिंटर भेट

लोणावळा : शहरी आणि ग्रामीण भागातील संगणकीय शिक्षणाची दरी कमी करण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम मावळ तालुक्यात राबविण्यात आला आहे. येथील घेरेवाडी आणि लोहगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ‘ऑफबीट फाउंडेशन’ (मुंबई) या संस्थेकडून १ लॅपटॉप आणि २ प्रिंटरची देणगी देण्यात आली आहे. या उपक्रमाने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे दरवाजे उघडले आहेत.

शाळेचे शिक्षक बाबासाहेब काळे, प्रियदर्शन भालेराव आणि सागर भांगरे यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत, स्थानिक समाजसेवक सागर धनिवले आणि ‘ऑफबीट जर्नीज ग्रुप’चे सहसंस्थापक सचिन देशमुख यांच्या पुढाकाराने ही मदत शक्य झाली. २० सप्टेंबर रोजी झालेल्या या सोहळ्याला ‘ऑफबीट फाउंडेशन’चे उपाध्यक्ष राहुल भडाळे यांच्यासह संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

या प्रसंगी लोहगड शाळेचे मुख्याध्यापक अतुल वाघ यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “ही साधने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. यामुळे मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख मिळेल आणि त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य अलकाताई धनिवले, ग्रामपंचायत सदस्या ज्योती सागर धनिवले यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. ‘ऑफबीट फाउंडेशन’ने याआधीही मावळ तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली असून, समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी ते कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर शिक्षकांनी फाउंडेशनच्या सदस्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यासामधील उत्साह आणि शाळेबद्दलची निष्ठा याबद्दल माहिती दिली. “साधनसंपत्ती कमी असली तरी आमची मुले मोठी स्वप्ने पाहतात,” असे सांगताना शिक्षकांच्या आवाजात एक वेगळाच अभिमान जाणवत होता. ‘शिक्षणातून सक्षम समाज, सक्षम भविष्य’ या ध्येयासाठी ‘ऑफबीट फाउंडेशन’ करत असलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *