इंदोरी मावळ : मावळ तालुक्यातील सांस्कृतिक इतिहासात प्रथमच शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ललिता पंचमी निमित्त आयोजित भव्य कुंकू मार्चन सोहळा. समाजसेवक प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने होत असलेला हा उपक्रम मावळ तालुक्यातील परंपरा आणि एकतेचा नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे.
या सोहळ्यासाठी खास भव्य जर्मन आंगल मंडप उभारणीला सुरुवात झाली असून, परिसर उत्सवाच्या तयारीने उजळून निघाला आहे. या कार्यक्रमात तब्बल तीन हजार महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत.
कुंकू मार्चन सोहळ्याला कालीचरण महाराजांचे मार्गदर्शन लाभणार असून, कार्यक्रमाला अध्यात्मिक उर्जा प्राप्त होणार आहे. यासोबतच मावळचे आमदार सुनील शेळके आणि सारिका ताई शेळके यांची उपस्थिती कार्यक्रमाचे महत्व अधिक अधोरेखित करणार आहे.
समाजातील ऐक्य, भक्ती आणि परंपरेचे दर्शन घडविणारा हा कुंकू मार्चन सोहळा महिलांच्या उत्साहाने आणि समाजाच्या सहभागाने एक नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास आयोजक प्रशांत भागवत यांनी व्यक्त केला आहे.
मावळच्या सांस्कृतिक जत्रेतून पहिल्यांदाच साकारला जाणारा हा उत्सव तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी आठवणीत राहणारा सोहळा ठरणार आहे.
