शिळींब विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी शिंदे यांची बिनविरोध निवड !

पवन मावळ, (प्रतिनिधी) : पवन मावळ विभागातील सहकार क्षेत्रातील प्रमुख सहकारी संस्था असलेल्या शिळींब विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज (शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर) रोजी पार पडली. महादेव मंदिर, गावठाण (शिळींब) येथे पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत सोसायटीच्या चेअरमनपदी शहाजी आनंदराव शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी अंकूश चिंधू चोरघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यावेळी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालक पदी संदीप मारूती शिंदे यांची निवड करण्यात आली.

शिळींब विकास सोसायटीचे सचिव रामदास पाठारे यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तर मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रुस्तुम-ए-हिंद पै. अमोल बुचडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा पार पडली. याप्रसंगी सोसायटीचे संचालक मंडळ सुरेश शं. जगताप, जालींदर ब. ढमाले, मधूकर म. केदारी, अविनाश शि. शिंदे, निवृत्ती ल. कडू, शाम रा. चोरघे, प्रकाश रा. धनवे, अनिता अं. धनवे, बायडाबाई अ. ढमाले, बबन बा. आखाडे, भाऊ चिं. शिंदे, भगवान ना. दरेकर (तज्ज्ञ संचालक) हे उपस्थित होते.

शिळींब विकास सोसायटीचे मावळते चेअरमन प्रकाश धनवे व व्हाईस चेअरमन निवृत्ती धनवे यांनी आपल्या पदाचा ठरविलेला कार्यकाल पूर्ण होताच राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विहित मुदतेत चेअरमनपदासाठी शहाजी शिंदे व व्हाईस चेअरमन पदासाठी अंकूश चोरघे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पूर्ण होताच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. शिळींब सोसायटीची निवडणूक मे २०२२ रोजी झाली असून सध्या अस्तित्वात असलेल्या सदस्य कार्यकारिणीचा कार्यकाल मे २०२७ पर्यंत असणार आहे.

याप्रसंगी चंद्रकांत शिंदे, विलास मालपोटे, नामदेव शेलार, ज्ञानेश्वर निंबळे, नामदेव ठुले, किसनराव धनवे, धिरज गरवड, अंकूश धनवे, दत्ता कडू, शहाजी कडू, संदीप ढमाले, बाजीराव ढमाले, नामदेव शिंदे, पांडुरंग मारणे, संदीप शिंदे, भाऊ आखाडे, शाम चोरघे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत, सभेचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन जालिंदर ढमाले यांनी केले.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित चेअरमन शहाजी शिंदे यांनी, सर्व कार्यकारिणीला सोबत घेऊन सोसायटीच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करणार असून सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे, आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिळींब सोसायटीचे कामकाज आदर्शवत राहील असे काम करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *