कामशेत : कामशेत परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १८०० ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची किंमत २७,००० रुपये आहे, जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा विभागातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना, कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पवनानगर रोडवर एक संशयित व्यक्ती पायी चालत जात असताना दिसली. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. चौकशीत त्याने आपले नाव नितेश उर्फ मनोज भन्साळी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) असे सांगितले.
पंचांच्या उपस्थितीत त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत हा गांजा सापडला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला कामशेत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन टोंपे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन घाडगे, तसेच पोलीस हवालदार राहुल पवार, सागर नामदास, तुषार भोईटे आणि पोलीस शिपाई भारत मोहळ, वैभव सावंत यांचा समावेश होता.

