लोणावळा: भारतीय जनता पक्षाच्या लोणावळा-नाणे मावळ मंडळाच्या कार्यकारिणीचा दुसरा विस्तार नुकताच करण्यात आला आहे. या विस्तारामध्ये विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप लोणावळा-नाणे मावळ मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुमित्रा हॉल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा पंधरवाडा’ या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर गुंड, महिला अध्यक्ष परिजा भिलारे, माजी शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल आणि बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सेवा पंधरवड्यात आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम आणि आरोग्य शिबिरासारख्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी सांगितले की, “या कार्यकारिणी विस्ताराचा मुख्य उद्देश पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयार करणे हा आहे.”

कार्यकारिणीचा विस्तार जाहीर करताना सुरेश जाणिरे यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी, समीर उंबरे यांची युवा मोर्चा सरचिटणीसपदी, प्रताप उंबरे यांची आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी आणि संगम वरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संदीप तळेगावकर यांची अल्पसंख्याक आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.





