लोणावळा : लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजगुरुनगर येथे ७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात मावळ तालुक्यातील आणखी काही शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर, दिवड येथील मुख्याध्यापक शशिकांत जाधव, न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव मावळ येथील शिक्षिका जयश्री बोरसे, वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव येथील शिक्षक राजेंद्र भांड, तसेच आदर्श विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे येथील शिक्षक श्रीहरी तनपुरे आणि संभाजी ठाकर यांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. भाऊसाहेब कारेकर, आणि शिक्षणाधिकारी (प्राथ.) संजय नाईकडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सर्व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. खेड तालुका माध्य. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाचे सचिव आणि जिल्हास्तरीय क्रीडापरिषद पुरस्कार विजेते रामदास रेटवडे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष उत्तमराव पोटवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
