लोणावळा: अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर लोणावळ्यातील लाडक्या बाप्पाला उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सुमारे नऊ तास चाललेल्या या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजेचा बोलबाला दिसून आला. मात्र, मिरवणुकीला झालेल्या विलंबामुळे शेवटच्या गणेश मंडळांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

लोणावळ्याची गणेश विसर्जन मिरवणूक सायंकाळी 5:30 वाजता शेतकरी पुतळा चौकातून सुरू झाली आणि रात्री 2:30 वाजता नगरपरिषद विसर्जन हौद येथे संपली. या मिरवणुकीत गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा नाद आणि डीजेचा दणदणाट लोणावळ्याच्या विसर्जन मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य ठरले. तसेच, बेंजोचा झंकार आणि लहान वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर धरलेला ठेका लक्षवेधी ठरला. मिरवणूक पाहण्यासाठी लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या गावांतून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
विसर्जन मार्गावर विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी गणेश मंडळांचे आणि भाविकांचे स्वागत केले. जयचंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, भाजप, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच लोणावळा नगरपरिषद आणि सत्यनारायण कमिटी यांनी स्वागत कक्ष उभारले होते. आमदार सुनील शेळके यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या स्वागत कक्षात उभे राहून गणेश मंडळांचे स्वागत केले. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्यासह इतर सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार केला.

जयचंद चौकात लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले. दुसऱ्या शिवसेनेकडून लाडवांचे वाटप करण्यात आले. याशिवाय विसर्जन मार्गावर गणेशभक्तांना सत्यानंद तीर्थधाम आश्रम, भांगरवाडी यांच्यावतीने महाप्रसाद, रामदेव बाबा भक्त मंडळाच्या वतीने भेळ तर लायन्स क्लबच्या वतीनं चहाचे वाटप करण्यात आले. याचा लाभ विसर्जनासाठी आलेल्या हजारो कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घेतला.

सदर मिरवणूक शांततेत आणि वेळेत पार पडावी यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पो. नि. राजेश रामाघरे यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर पोलीस अव्याहतपणे काम करीत होते. मात्र सुरवातीच्या मंडळांनी रेंगाळवलेली मिरवणूक आणि नंतर शेवटच्या मंडळांची करण्यात आलेली पळवापळवी मिरवणुकीत थोडा गोंधळ निर्माण करून गेली.

