लोणावळ्यात सुरेखाताई जाधव यांचा गणेशोत्सव मंडळांना ‘संवाद दौरा’; पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची चर्चा!

लोणावळा: लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. या भेटींमध्ये त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या या संवाद दौऱ्यामुळे आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

माजी नगराध्यक्षांच्या या दौऱ्यात भाजप महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सुरेखाताई जाधव यांनी लोणावळ्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आपल्या सर्व सहकारी नगरसेवकांसोबत झपाटून काम केले होते. विकासकामे मार्गी लावण्याची आणि काम करून घेण्याची त्यांची क्षमता, प्रभावी व्यक्तिमत्व आणि अडल्यानडल्याच्या मदतीसाठी वेळेची तमा न बाळगता रात्रीअपरात्री देखील धावून जाण्याची त्यांची वृत्ती या गुणांमुळे त्या नागरिकांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. शिवाय त्यांना लोणावळ्यातील स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आहे.

स्वच्छ सर्वेक्षणातील यश आणि कोविड काळातील कामगिरी

सुरेखाताई जाधव यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे आणि सहकारी नगरसेवकांसमवेत स्वतः उभं रहात करून घेतलेल्या कामामुळे लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत 2018 साल पासून आतापर्यंत सलग देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळवले. कचरा समस्येने ग्रासलेल्या लोणावळ्याचे रूप त्यांनी पूर्णपणे पालटले. या कामगिरीबद्दल शहराचे देशभरात कौतुक झाले. त्याचप्रमाणे, कोविड महामारीच्या काळात त्यांनी लोणावळेकरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केलेले धडाकेबाज कामही सर्वांना माहीत असून त्यांचे काम सर्वत्र चर्चेचा विषय ठरले होते.

नजीकच्या काळातच नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने, सुरेखाताई जाधव यांनी सुरू केलेल्या या संवाद दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे त्या पुन्हा एकदा नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यांच्या समर्थकांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *