लोणावळा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात काल मंगळवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. लोणावळा शहरात सातत्याने पडणाऱ्या पावसाने सकाळच्या सत्रात थोडी उघडीप दिल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. ढोल, ताशे यांच्या गाजरात घरगुती गणेशमूर्ती घेऊन जाणारे कार्यकर्ते दुपारी जेव्हा आपल्या सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती आणायला बाहेर पडले, तेव्हा मात्र त्यांना पुन्हा परतलेल्या पावसानं चांगलंच झोडपून काढलं.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळ पासूनच गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या अबाल वृद्धांसह बालगोपाळांनी लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठ गजबजून गेली होती. अनेकांनी तर सोमवारी रात्रीच आपापल्या मूर्ती घरी नेल्या होत्या.
गणेश आगमनाचा उत्साह शिगेला असतानाच पावसाने मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरात जोरदार हजेरी लावल्याने अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरले गेले. अचानक येणारा पाऊस संपूर्ण शहराला झोडपून काढत आहे. पावसाच्या पाण्यापासून आपल्या गणेश मूर्तीचा बचाव करून मूर्ती आपल्या घरापर्यंत तसेच मंडळाच्या मंडपा पर्यंत घेऊन जाण्याची धडपड करताना नागरिक आणि गणेश मंडळ कार्यकर्ते करताना दिसून येत होते.
