लोणावळा : ‘वंदे मातरम’ या स्वातंत्र्य मंत्राच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने ‘शिवसेवा प्रतिष्ठान’ने लोणावळ्यात ‘वंदे मातरम १५०’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू असलेल्या मुसळधार पावसातही लोणावळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाला डॉक्टर, वकील, व्यावसायिक, तसेच बापूसाहेब भोंडे हायस्कूल, डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालय आणि व्ही. पी. एस. हायस्कूलच्या शिक्षक-विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच, कामशेत, कांबरे, आणि कुसगाव येथील अनेक कुटुंबेही सहभागी झाली.
अभिषेक खेडकर, प्रदीप फाटक आणि अवंती लोहकरे यांनी सादर केलेला हा दृकश्राव्य कार्यक्रम उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या काव्याचा जन्मापासून ते स्वातंत्र्य मंत्र बनण्यापर्यंतचा १५० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास या कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी ‘वंदे मातरम’चे अभ्यासक आणि लेखक मिलिंद सबनीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी आणि प्रदीप फाटक यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘वंदे मातरम’ने झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘शिवसेवा प्रतिष्ठान’च्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
