वडगाव मावळ: तालुक्यातील नवलाख उंबरे येथे पार पडलेल्या ‘मावळ केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध नियोजनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, मुख्य आयोजक प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.
पैलवानांच्या ‘खुराका’चे अजितदादांकडून विशेष कौतुक
नुकत्याच झालेल्या मावळ दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘मावळ केसरी’ स्पर्धेचा आवर्जून उल्लेख केला. स्पर्धेत सहभागी झालेल्या पैलवानांना देण्यात आलेला सकस आहार (खुराक) आणि खेळाडूंना पुरवण्यात आलेल्या उत्तम सुविधा पाहून अजितदादांनी आयोजकांच्या व्यवस्थापन कौशल्याची प्रशंसा केली.
केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर इंदोरी जिल्हा परिषद गटात प्रशांत भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत अजितदादांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
हनुमान मूर्ती देऊन उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
अजितदादांनी केलेल्या कौतुकाचा स्वीकार करताना, प्रशांत व मेघाताई भागवत यांनी उपमुख्यमंत्र्यांना शक्तीची देवता असलेल्या हनुमंताची भव्य मूर्ती भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. या सोहळ्याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

