मावळ, (प्रतिनिधी): मावळच्या मातीतील कुस्ती परंपरेला नवसंजीवनी देण्यासाठी प्रशांत दादा भागवत युवा मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा’ कार्यक्रमाला मावळ तालुका कुस्तीगीर संघाने अधिकृत मान्यता प्रदान केली आहे. या मान्यतेमुळे स्पर्धेची प्रतिष्ठा वाढली असून, कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा देत आपला पाठिंबा दर्शविला आहे.
तालुका कुस्तीगीर संघाचे अधिकृत मान्यता पत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ऑलिंपिक वीर मारुती अण्णा आडकडर, महाराष्ट्र चॅम्पियन संभाजी राक्षे यांच्यासह मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खंडू भाऊ वाळुंज, कार्याध्यक्ष नागेश भाऊ राक्षे, महाराष्ट्र चॅम्पियन्स तानाजी भाऊ कारके, तानाजी भाऊ काळोखे आणि राकेश भाऊ सोरटे, तसेच संघाचे सचिव बंडू भाऊ येवले, सहसचिव पप्पू भाऊ कालेकर, कामगार केसरी दीपक भाऊ दाभाडे आणि इतर स्थानिक मान्यवर उपस्थित होते. या दिग्गजांच्या उपस्थितीने नवोदित कुस्तीगिरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वर्षी ‘मावळ केसरी’ स्पर्धेचे आयोजन अत्यंत आकर्षक पद्धतीने करण्यात आले आहे, अशी माहिती मेघाताई भागवत यांनी दिली. यामध्ये सर्व वयोगटांना संधी देण्यात आली आहे:
- १४ वर्षाखालील गट: २२ ते ४२ किलो
- १७ वर्षाखालील गट: ४२ ते ७० किलो
- वरिष्ठ गट: ५७ ते १२५ किलो
विशेष म्हणजे, महिला कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र वजन गट ठेवण्यात आले आहेत: २५ ते ३० किलो, ३१ ते ३५ किलो, ३६ ते ४५ किलो, ४५ ते ५० किलो आणि ५० किलोपेक्षा पुढील वजन गट. यामुळे महिला खेळाडूंमध्येही मोठा उत्साह संचारला आहे.
ही भव्य स्पर्धा श्रीराम विद्यालयासमोर, नवलाख उंब्रे (मावळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. मावळच्या होतकरू कुस्तीगीरांना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार असून, नवोदित खेळाडूंना व्यासपीठ देण्याच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.

