लोणावळा : सर्व मतदार बंधू-भगिनींना विनम्र अभिवादन ! दोन डिसेंबर रोजी लोणावळा नगरपरिषदेचे सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मतदान हा संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे. आपले मत हे अमूल्य आहे, त्याचे कोणतेही बाजार मूल्य करता येणार नाही. आपल्या शहराच्या, आपल्या प्रभागाच्या विकासासाठी विकासाची दृष्टी असलेला लोकप्रतिनिधी निवडून देणे हे प्रत्येक सजग मतदाराचे प्रथम कर्तव्य आहे. मित्रांनो सार्वत्रिक निवडणुक ही पाच वर्षाची असते व त्याकरता अचूक लोकप्रतिनिधी निवडून देणेदेखील मतदारांचे परम कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी निवडताना चूक झाल्यास पुढील पाच वर्ष त्याचा पश्चाताप भोगाव लागतो. व त्याचा परिणाम प्रभागाच्या तसेच शहराच्या विकासावर होतो. याकरिता मतदान हे निर्भयपणे करा, कोणत्याही आमिषाला, कोणत्याही दबावाला बळी न पडता सदसद्विवेकबुद्धीला स्मरून विकासाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीलाच मतदान करा.
लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे एवढा पैशाचा बाजार यावर्षी झाला आहे. पैशाच्या जोरावर मते विकत घेत लोकशाहीची थट्टा लोणावळा शहरांमध्ये मांडली गेली आहे. केवळ 15 ते 20 दिवसांच्या या घोडा बाजारामुळे लोणावळा शहराचे पुढील पाच वर्षाचे भविष्य अंधारामध्ये जाण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत. आपल्या शहराच्या व आपल्या मुलाबाळांच्या भविष्याच्या विचाराचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चांगल्या उमेदवाराला मतदान करा. आपले मत वाया जाऊ देऊ नका, आपले मत विकू नका व कोणाला विकत देखील घेऊ देऊ नका. जे तुमच्या घरी आले, ज्यांनी तुम्हाला लक्ष्मी दिली, त्याचा आदर करा, मात्र मत हे पूर्ण विचार करूनच योग्य उमेदवाराला द्या. पैशाच्या जीवावर मतांचा बाजार करत लोकशाहीची थट्टा करणाऱ्यांना यंदा धडा शिकवत घरी बसवा व विकासाचा दृष्टिकोन असलेले चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्या व शहराच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सर्व मतदार बंधू-भगिनींना करत आहोत.

