लोणावळा : नांगरगाव, लोणावळा येथील वार्ड क्र. ५ च्या बहुचर्चित निवडणुकीत (दिनांक २७ नोव्हेंबर २०२५) एक महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे. वडगाव मावळ येथील जिल्हा न्यायालयाने भाजपचे उमेदवार सुभाष डेनकर यांनी दाखल केलेले नामांकन पूर्णपणे वैध ठरवले आहे.
या संदर्भात, प्रतिस्पर्धी उमेदवार मुकेश परमार यांनी डेनकर यांच्या नामांकनाला आव्हान देत ते ‘शून्य व अवैध’ घोषित करण्याची मागणी करणारा दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर, परमार यांचा दावा फेटाळून लावत डेनकर यांचे नामांकन पूर्णपणे वैध असल्याचा स्पष्ट निर्णय दिला.
उमेदवाराची प्रतिक्रिया
न्यायालयाच्या निर्णयानंतर सुभाष डेनकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की,
“हा दावा पूर्णपणे निराधार होता. वार्ड क्र. ५ मधील जनतेचा मिळत असलेला प्रचंड पाठिंबा पाहून विरोधक दबावाखाली आले आहेत आणि त्यांना पराभवाची भीती वाटू लागल्यामुळेच हा खटला उभा करण्यात आला होता.”
या निर्णयामुळे आता सुभाष डेनकर यांचा वार्ड क्र. ५ मधील निवडणुकीचा मार्ग अधिक भक्कम झाला असून, परमार यांच्या दाव्याला स्पष्ट शब्दांत न्यायालयाने नकार दिला आहे. एकाच वार्डातून दोन प्रमुख उमेदवार निवडणुकीत उतरल्याने या न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते.
न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुकीच्या लढतीतील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे, ज्यामुळे डेनकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

