पवनानगर, दि. ५ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे. विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ते अलीकडेच दौऱ्यावर असून, ग्रामस्थांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मंगळवारी त्यांनी सावंतवाडी, प्रभाचीवाडी, काले आदी गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक, महिला व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. गावांतील विकासविषयक प्रश्नांवर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.


यानंतर त्यांनी गेव्हंडे आणि आपटी या गावांनाही भेट दिली. येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक समस्या, गरजा आणि उपाययोजनांवर चर्चा केली. नागरिकांनीही गावातील विविध कामांबाबत सूचना मांडल्या.
संध्याकाळी मळवंडी ठुले येथे आयोजित काकडा आरती आणि हभप कृष्णा महाराज पडवळ यांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांनी सहभागी होत ग्रामस्थांशी आपुलकीचा संवाद साधला. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी हभप पडवळ महाराज आणि उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला.
गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात नागरिकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याची संधी मिळाल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.

