सद्गुरु संगीत सदनतर्फे गायन–वादनाची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणावळा : लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात या वर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने सुरांच्या प्रकाशाने उजळली! भांगरवाडी येथील सद्गुरु संगीत सदन तर्फे आयोजित “रिधुन दिवाळी पहाट” या संगीत कार्यक्रमाने लोणावळ्याच्या रसिकांना अविस्मरणीय सुरेल सकाळ अनुभवायला मिळाली.
https://www.facebook.com/share/v/19YmWRRDQL/
कार्यक्रमाचे आयोजन भांगरवाडी येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. मंगलमय वातावरणात झालेल्या सरस्वती पूजनानंतर दीपप्रज्वलनाचा मान श्री कौस्तुभ दामले, श्री चंद्रकांत जोशी, श्री साजिद मिरजकर, श्री सुरेश गायकवाड, श्री महेश खराडे, श्री पांडुरंग तिखे, श्री सुरेश कदम, श्री संजय गोळपकर व डॉ. प्रकाश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात हर्षदा मानकर व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने – गणेश वंदनाने झाली. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका झी सारेगमप फेम मृण्मयी फाटक यांनी आपल्या मधुर आवाजात “सुंदर ते ध्यान”, “ध्यान लागले रामाचे”, “केव्हातरी पहाटे”, “हे सुरांनो चंद्र व्हा”, “भरजरी ग पितांबर” आणि “सूर निरागस हो” अशा रचना सादर करून रसिकांना भावविश्वात नेले.
यानंतर पं. अनुप जलोटा यांचे शिष्य आचार्य शंभू लहरी यांनी “राम का गुणगान कीजिए”, “ऐसी लागी लगन”, “मे नाही माखन खायो” आणि “माझे माहेर पंढरी” या रचनांनी सभागृहात भक्तिरस ओतप्रोत भरला. मृण्मयी फाटक आणि शंभू लहरी यांनी एकत्रितपणे “केसरिया बालमा” आणि “बाजे मुरलिया बाजे” या युगल सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.
स्थानिक प्रसिद्ध गायिका सौ. मीनाक्षी गायकवाड यांनी “हृदयी प्रीत जागते”, “शिवकल्याण राजा” व लता मंगेशकर यांनी गायलेले “गुणी बाळ असा” ही गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.
मध्यंतरात प्रसिद्ध सतारवादिका तिला तमा सूर्यवंशी यांनी राग पिलू मध्ये तीनतालातील गत आणि दादरा तालातील धून वाजवून प्रेक्षकांना वादनकलेचा अद्भुत अनुभव दिला. कार्यक्रमाची सांगता आचार्य शंभू लहरी यांच्या “सुमिरण करले मेरे मना” या भैरवीने झाली.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये ॲड. माधवराव भोंडे (चेअरमन, बापूसाहेब भोंडे हायस्कूल), श्री किरीट जोशी (विश्वस्त), श्री अमित गवळी (मा. नगराध्यक्ष), सौ. सुरेखाताई जाधव (मा. नगराध्यक्ष), श्री विजय उर्फ पोपटशेठ मोरे (मा. नगरसेवक), श्री श्रीधर पुजारी (मा. उपनगराध्यक्ष) आणि श्री अरविंद कुलकर्णी श्री विशाल पाडाळे,श्री श्रीराम कुमटेकर (पत्रकार) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री दत्तात्रेय येवले, श्री प्रकाश पाठारे, श्री शरद व सीमा कुलकर्णी (ओमकार हॉस्पिटल), ॲड. प्रथमेश रजपूत, श्री संदीप कोराड, श्री भावेश परमार, सौ. अपर्णाताई बुटाला, भरत अग्रवाल नागरी पतसंस्था, श्री सुभाष डेनकर, श्री नंदकुमार वाळंज, ॲड. सुहास नागेश, श्री अनिल गायकवाड, श्री राजेंद्र चव्हाण आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
संगीत साथ :
श्री मनोज कदम (तबला), श्री अजित चव्हाण (सिंथेसायझर), श्री चेतन भेसानिया (हार्मोनियम), श्री गणेश केदारी (तबला), ईश्वर पवार व विशेष कालेकर (साईट रिदम), आर्य घंगाळे (कहोन) यांनी दिली.
निवेदन : श्री बापूलाल तारे
ध्वनी व्यवस्था : मोरया साउंड – श्री कुमार व मनोज हारपुडे
मंडप व्यवस्था : श्री विशाल दिघे
‘रिधुन दिवाळी पहाट’ या सुरेल कार्यक्रमाने लोणावळ्याच्या संगीतप्रेमी रसिकांना आनंद, समाधान आणि सांगीतिक प्रेरणेचा अनमोल अनुभव दिला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

