लोणावळा (प्रतिनिधी):
लोणावळा शहर आणि परिसरात विविध सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रमांनी आपला ठसा उमटवणाऱ्या ‘शंकरबन प्रतिष्ठान’ने दिवाळीच्या शुभ पर्वावर एक स्तुत्य उपक्रम राबवून समाजासमोर दातृत्वाचा आदर्श ठेवला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने बी. एन. पुरंदरे हायस्कूल, लोणावळा येथे शिक्षण घेणाऱ्या आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन होतकरू विद्यार्थिनींची संपूर्ण शालेय फी भरून त्यांना मदतीचा हात दिला गेला.
या दोन सख्ख्या बहिणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण सुरू ठेवत आहेत. त्यांचे आई-वडील नसल्याने त्यांची जबाबदारी त्यांच्या वयोवृद्ध आजीवर आहे. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ‘शंकरबन प्रतिष्ठान’ने मागील वर्षापासूनच या विद्यार्थिनींच्या शालेय फीची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फी भरून त्यांच्या शिक्षणाची चिंता दूर केली.
याप्रसंगी शंकरबन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू दादा निकम, विश्वस्त श्री. अनंता टेमघरे, सुनील दळवी, सौ. जान्हवी कसबेकर, प्रभाकर भालेकर, विशाल जाधव, संतोष दाभाडे, शंकर दळवी, संदिप चव्हाण, गणेश धामणस्कर, राजाराम बिरांजे, नंदुभाऊ वर्तक, धर्मेंद्र डुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे विश्वस्त श्री. सुनील दळवी म्हणाले की, अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन दातृत्व दाखवणे आवश्यक आहे. शंकरबन प्रतिष्ठान नेहमीच समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. यासोबतच, युवकांना योग्य मार्गावर आणून संस्कारक्षम समाज घडवण्यासाठी प्रतिष्ठानकडून अध्यात्मिक केंद्र उभारणीचे कामही सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
शंकरबन प्रतिष्ठानच्या या कृतीमुळे या दोन विद्यार्थिनींना दिवाळीचा खरा आनंद मिळाला असून, त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे.

