इंदोरी-वराळे, मावळ : नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत मावळ तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यानंतर, या गटात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या गटातून आता प्रशांतदादा भागवत यांच्या पत्नी मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
“कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही!” असा ठाम निर्धार करून मेघाताई भागवत यांनी आपली तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. त्यांच्या या एन्ट्रीमुळे इंदोरी-वराळे गटातील निवडणूक आता अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे.

महिलांमध्ये मजबूत पकड, सामाजिक कार्याची मोठी पार्श्वभूमी
मेघाताई भागवत आणि प्रशांतदादा भागवत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यातील महिलांसोबत सातत्याने सक्रिय जनसंपर्क ठेवला आहे. ‘मनोरंजन संध्या’, भव्य ‘कुंकू मार्चन सोहळे’, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी आपली एक मजबूत सामाजिक ओळख निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या सामाजिक कामामुळे महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता आणि संपर्क अत्यंत मोठा आहे.
‘दादां’च्या विकासकामांचा फायदा ‘ताईं’ना!
प्रशांतदादा भागवत यांनी केलेल्या विकासकामांचा आणि मागील काळात राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचा थेट फायदा आता त्यांच्या पत्नी मेघाताईंना निवडणुकीत होणार असल्याचे बोलले जात आहे. भागातील नागरिकांशी असलेले प्रशांतदादांचे वैयक्तिक संबंध आणि त्यांची कार्यशैली या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.
मेघाताई भागवत यांनी ही निवडणूक लढवून ‘विजय संपादन करण्याचा निर्धार केला आहे,’ अशी माहिती त्यांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. मेघाताई भागवत यांच्या उमेदवारीमुळे मावळच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

