लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले असून, या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून आमदार सुनील शेळके पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा हातात घेतलेल्या आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग क्र. १३ मधील उमेदवारांच्या प्रचारदौर्यास नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
नगराध्यक्ष पदासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे तसेच प्रभाग क्र. १३ मधील उमेदवार श्री. धनंजय वसंत काळोखे, सौ. प्रियांका किशोर कोंडे व सौ. सोनाली संभाजी मराठे यांच्या समर्थनार्थ झालेल्या या दौऱ्यात आमदार शेळके स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधत राहिले. प्रभागातील गल्लीबोळ, वसाहती, व्यापारी पेठा, झोपडपट्ट्या अशा प्रत्येक भागात जाऊन पक्षाच्या योगदानाची व आगामी योजनांची माहिती त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली.

दौर्यात नागरिकांमध्ये दिसलेला उत्साह, उमेदवारांबद्दल निर्माण झालेली सकारात्मक भावना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे संपूर्ण वातावरण निवडणूकपूर्व रंगात न्हाऊन निघाले. अनेक नागरिकांनी विकासकामांवरील सातत्यपूर्ण भूमिका, अचूक समस्या निवारण आणि लोकाभिमुख निर्णयशैलीमुळे आमदार शेळके यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे प्रत्यक्ष संभाषणात व्यक्त केले.
प्रचारदौर्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी सुनील शेळके यांची संपर्क शैली आणि संघटन कौशल्य अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रभाग १३ मधील प्रचाराने संपूर्ण शहरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या ‘विजयी लाटेचा’ संदेश दिला असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे.
लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस धोरणे आणि जनतेच्या मनात असणारा त्यांचा स्वीकार पाहता, यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांचे नेतृत्व म्हणजे विजयाचा मार्ग असा सूर शहरभर उमटताना दिसत आहे.


